अमावास्याही शुभ असते !
- Ashish Karekar
- Jan 16, 2022
- 3 min read
Updated: Jun 11, 2024

प्राचीनकाळी अमावास्या ही शुभ मानली जात असे. सर्व देव अमावास्येच्या ठिकाणी निवास करतात असे अथर्ववेदात म्हटले आहे. सध्या मात्र अनेकजण अमावास्या अशुभ मानतात.
वैशाख अमावास्येला ‘भावुका अमावास्या ‘म्हणतात.
अमावास्या सोमवारी आल्यास तिला ‘सोमवती अमावास्या ‘ म्हणतात. या दिवशी महिला अश्वत्थाची पूजा करून त्याला १०८ वस्तू अर्पण करतात. आषाढातील अमावास्या ‘ दिव्याची अमावास्या ‘असते. या दिवशी दिव्यांची निगा राखून दीपपूजन केले जाते.
श्रावणातील अमावास्येस ‘ पिठोरी अमावास्या ‘म्हणतात. भाद्रपद अमावास्या ही ‘ सर्वपित्री अमावास्या ‘ म्हणून मानली जाते. आश्विनातील अमावास्या ‘ लक्ष्मीपूजनाची अमावास्या’ ही मंगलदायक म्हणून मानली जाते. अमावास्येला नदीस्नान करण्याची प्रथाही प्राचीनकाळी होती.
भारतात अनेक ठिकाणी अमावास्येच्या दिवशी सूर्यपूजा व व्रतवैकल्ये करण्याचीही प्रथा आहे.
‘अमा ‘ म्हणजे सह, ‘ वस् ‘ म्हणजे राहणे. ‘सूर्याचन्द्रमसोर्य: पर: सन्निकर्ष: सामावास्या’ म्हणजे सूर्य चंद्राच्या परम सान्निध्याला अमावास्या म्हणावं असे सांगण्यात आले आहे. ज्या तिथीला चंद्र दिसत नाही अशी व्याख्याही प्राचीन एका ग्रंथामध्ये केली आहे.
अमावास्येचा उल्लेख ऋग्वेदात नाही. परंतु सूर्यग्रहण हे अमावास्येलाच होते आणि सूर्यग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे. अथर्ववेदात अमावास्ये संबंधी एक सूक्त आढळते.
अमावास्येला पृथ्वीच्या संदर्भात चंद्र व सूर्य एकाच रेषेत येतात. त्यानंतर पौर्णिमेपर्यंत शुक्लपक्षात चंद्राचे सूर्यसापेक्ष कोनात्मक अंतर वाढत जाते.
पौर्णिमेलाच ते १८० अंश होते. कृष्णपक्षात चंद्र व सूर्य यांमधील कोनात्मक अंतर कमी कमी होत जाते.
सध्या काही लोक अमावास्या ही अशुभ असते असे मानतात परंतु प्राचीनकाळी अमावास्या ही शुभ मानली जात असे. अथर्ववेदातील सूक्तामध्ये अमावास्या म्हणते समस्त देव माझ्याप्रत येऊन माझ्या ठायी निवास करतात. साध्यादी देव, तसेच इंद्रप्रमुख देवगण माझ्यासह राहत असल्यानेच मला ‘ अमावास्या’ हे नांव मिळाले.
अमावास्येची रात्र आम्हास धनदायी होवो असाही एका सूक्तामध्ये सांगितले आहे. रामायणकाली अमावास्या शुभ मानीत होते असे उल्लेखही सापडतात. रावणाचा सुपार्श्व नावाचा बुद्धिमान अमात्य रावणाला म्हणाला - आज कृष्णपक्षातील चतुर्दशी आहे.
यासाठी तू आजच युद्धाच्या तयारीला लाग आणि सेनेला बरोबर घेऊन तू उद्या अमावास्येच्या मुहूर्तावर विजयासाठी बाहेर पड. महाभारतात मात्र काही ठिकाणी अमावास्या ही शुभ मानलेली आहे, तर काही ठिकाणी अशुभ मानलेली आहे.
कृष्णाने कर्णाजवळ युद्धघोषणा करतांना म्हटले आहे - आजपासून सातव्या दिवशी अमावास्या आहे. इंद्र ही तिची देवता आहे. त्या दिवशी युद्धाला प्रारंभ होईल. श्रीकृष्णाला यादवांच्या विनाशाची जी लक्षणे दिसत होती, त्यातच त्याने ‘त्रयोदशीयुक्त अमावास्या हा एक योग सांगितला आहे.
भारतीय युद्धाच्यावेळी असाच योग होता. हेही त्याने याच वेळी सांगितले आहे. महाभारतात एके ठिकाणी अमावास्येचा एक भयंकर मुहूर्त असा उल्लेख केलेला आहे.
अमावास्येचे दोन प्रकार आहेत. एक सिनीवाली आणि दुसरी कुहू या पूर्वा अमावास्या सा सिनीवाली। या उत्तरा सा कुहू असे वचन आहे. म्हणजेच कृष्ण चतुर्दशी युक्त अमावास्येला ‘ सिनीवाली म्हणतात आणि शुक्ल प्रतिपदायुक्त अमावास्येला कुहू म्हणतात. असे अनेक प्राचीन ग्रंथांमधून सांगण्यात आले आहे.
दिनमानाचे पाच भाग करावे. पहिला भाग प्रात:काळ, दुसरा भाग संगवकाळ, तिसरा भाग मध्यान्हकाळ, चौथा भाग अपराण्हकाळ आणि पाचवा भाग सायंकाळ मानावा असे सांगण्यात आले आहे.
अपराण्हकाळी अमावास्या असेल त्या दर्श अमावास्येस अमावास्या श्राद्ध करावे असे सांगण्यात आले आहे.
अमावास्या आणि मृत्यू
अमावास्येच्या दिवशी जास्त अपघात होतात मृत्यूही जास्त होतात असाही एक गैरसमज आहे. एखादा पेशंट सिरियस असेल तर अमावास्या टळून जाऊदे, म्हणजे त्याच्या तब्बेतीत सुधारणा होईल असे आपण म्हणतो त्यातही काही तथ्य नाही.
मृत्यू आणि अमावास्या यांचा काहीही संबंध नाही. साधारण पंधरा वर्षांपूर्वी मी स्वत: याबाबत संशोधन केले होते. महानगर पालिकेमध्ये जन्म-मृत्यू नोंदणी विभागात काही लोकांना बरोबर घेऊन सुमारे काही आठवडे मी हे संशोधन केले.
तेथे मृत्यूच्या नोंदणीच्या तारखेप्रमाणे फाइल्स होत्या. मृत्यूच्या तारखेप्रमाणे नव्हत्या. त्यामुळे आम्हाला प्रत्येक फाॅर्म पाहून मृत्यूच्या तारखांप्रमाणे स्वतंत्र नोंदणी करावी लागली होती. महानगर पालिकेने आम्हाला आॅफिसमध्ये जागा उपलब्ध करून सर्व वार्डातील फाईल्स उपलब्ध करून दिल्या होत्या. दररोज सरासरी शंभर लोक मृत्यू पावतात असे आम्हाला आढळले. परंतू अमावास्येला जास्त मृत्यू होतात असे आढळले नाही.
फक्त एकावर्षी १ जानेवारीला अमावास्या होती आणि त्या दिवशी एक विमान मुंबई जवळच्या अरबी समुद्रात कोसळले होते. त्या अमावास्येच्या दिवशी मात्र जास्त मृत्यू झाले असल्याचे आढळले होते. बाकी एकाही अमावास्येच्या दिवशी जास्त मृत्यू झाल्याचे आढळले नाही.
आम्ही पंधरा वर्षांचा रेकाॅर्ड तपासला होता. अमावास्येच्या दिवशी जास्त मृत्यू होत नाहीत असे अनुमान काढले होते. अमावास्या आणि मृत्यू यांचा काहीही संबंध नाही.
अमावास्येला घाबरण्याचे काहीही कारण नाही. कारण या दिवशी चंद्र-सूर्य दोघेही आपल्या पाठीशी असतात.
अमावास्याहीनिसर्गातीलएकघटनाअसते. तीअशुभनसते.




Comments