चंपाषष्ठी - " येळकोट येळकोट जय मल्हार "
- Ashish Karekar
- Jan 16, 2022
- 1 min read
Updated: Jun 11, 2024

आज चंपाषष्ठी सोबत मार्गशीर्ष गुरूवार व्रताचा देखील पहिला दिवस आहे. त्यामुळे धार्मिकदृष्ट्या आजचा दिवस अनेकांसाठी आनंद द्वुगुणित करणारा आहे.
श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत. मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खंडोबाची उपासना जास्त केली जाते. खंडोबाची नवरात्र मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठि अशी सहा दिवस साजरि केली जाते. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठि म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पांच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात.
खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे. भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात.), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधि असतो.
तळी भरणे म्हणजे एका ताम्हनात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हन "सदानंदाचा येळकोट" किंवा "एळकोट एळकोट जय मल्हार" असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात.
देवाजवळ नंदादीप सहाही दिवस तेवत ठेवतात. देवाला रोज माळ वाहतात, देवाची रोज पूजा, नैवेद्य व आरती करतात. आरतीसाठी पीठाचे दिवेही केले जातात. सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा. मल्हारी महात्म्याचे, मल्हारी स्तोत्रांचे श्रवण नवरात्राच्या या दिवसांत फार फलदायी होते.
खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे. त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्व आहे. खंडोबा अपत्य जन्म आणि विवाहातील अडथळे दूर करतो.
Commenti